तुमची बर्थडे विश काय आहे ह्या वर्षी?

तुमची बर्थडे विश काय आहे ह्या वर्षी?

वाढदिवस- काय असतो नक्की? आनंदाचा दिवस, आपल्या लोकांसोबत आनंदाने घालवण्याचा दिवस. आपण मोठं झालोय पण ते कळू नये, (अर्थात काही क्षणांकरता) त्याचं वाईट वाटू नये म्हणून आपली माणसं ह्या दिवशी आपल्याला भेटतात, आपल्याला गिफ्ट देतात, म्युझिक, डान्स, केक, सेल्फी, फेसबुक च्या शुभेच्छा, इंस्टाग्राम च्या पोस्ट, ह्यांनी दिवस कसा आणि कुठे जातो कळत च नाही ना?
 
आणि .. आणि ह्या गडबडीत ह्या सगळ्या पसाऱ्यातून एक कुणी आपली व्यक्ती हळूच मनाचा ताबा घेते,ती  त्या व्यक्तीच्या एका प्रश्नाने.ओळखता येईल का काय तो प्रश्न?
 
तुझी बर्थ डे विश काय आहे ?
 
आज असाच प्रश्न मलाही विचारला. माझ्या जवळच्या व्यक्तीने.
 
तुम्हाला सांगू का, ह्यापूर्वी ना उत्तर लगेच तोंडात येईल असं असायचं.आजकाल तसं होत नाही.का ? त्याचं कारण मी पण शोधतीये.
 
कसं असतं बघा ना, आपण लहान असतो तेव्हा वयाच्या 2 वर्षापर्यंत आपल्याला आपला वाढदिवस म्हणजे काय ते ठाऊक पण नसतं. मग तिसऱ्या वर्षीपासून हळू हळू कळतं. त्यावेळी आपले आई वडील जमेल तसं  छान पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करतात. अगदी आपण म्हणू तसा. दहावी बारावी ला जाई पर्यंत अगदी एखादी बाहुली किंवा रिमोट कंट्रोलच्या कारपासून ते मोबाईल पर्यंत दिलेलं सगळं आपल्याला अपार आनंद  देऊन जातं आणि मग सुरू होतो पुढचा प्रवास.
 
म्हणायला गेलं तर खूप काही शिकवून जाणारं आणि म्हणायला गेलं तर खूप काही घेऊन जाणारं आयुष्य.P
 
अशाच एका जागी मलाही आज तोच प्रश्न पडतोय. माझी बर्थ डे काय आहे.
 
मी खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारी मुलगी होते. असं नाही की आज छोट्या गोष्टी मला आनंद देत नाहीत पण कुठेतरी मी ती उरली नाही असं वाटायला लागलं आहे.
 
असं का होतं आपल्यासोबत हेच शोधत होते. अन सापडलं ते कटू सत्य आहे पण शेवटी सत्य आहे.
 
लग्नाच्या अगोदर आपण आपल्या सेफ झोन मध्ये असतो. आपली माणसं, ओळखीची माणसं. ज्यांना आपण आणि ती आपल्याला पुरे ओळखून असतात.त्यामुळे तिथे शक्यतो आपण त्यांना आणि त्यांनी आपल्याला आनंदी ठेवणं बऱ्यापैकी सोपं असतं.त्यानंतर आपलं लग्न होतं. मग मुलगी सासरी जाते.तिकडे ती आपल्या सासरच्या लोकांना खुश ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न करते.पण तुला हेच येत नाही, तुला हे कुणी शिकवलं नाही का, तू असं कसं वागू शकते, तुला आता इकडच्या लोकांचापण विचार करावा लागेल ना, तू ना हे असं करत जा, हे असं नको तसचं कर.अशा बऱ्याच गोष्टींच्या दाडपणाने ती बिचारी थकून प्रयत्न करणं सोडून देते.मग हाती येते ती निराशा. कितीपण करा कमीच पडतं.असं म्हणायला लागते ती.
 
मग ह्यातच जन्माला येतं ते तिचा बाळ.पहिलीच वेळ असते, साधं बाळ धरता येत नसतं तरीपण ती एकटी बाळ, बाळाचे सगळे काही, नवऱ्याचे करून बाळाचे सगळे काही बघते. बाळ हळू हळू मोठं होऊ लागतं आणि ती त्याचे जमेल तसे लाड आणि हट्ट पुरवू लागते.
 
एक दिवस अचानक लक्षात येतं, की अरे, लग्न, संसार, बाळ, बाळाचे लाड, नवऱ्याच्या अपेक्षा, सासारच्यांच्या अपेक्षा, त्यांची मन सांभाळणे, सगळ्यांचा मानपान ठेवल्या ठिकाणी ठेवणे, घर आणि नोकरी ह्यात अंतर ठेवून घर सांभाळणे, ह्या सगळ्यात माहेरची माणसं जपणे, सासर आणि माहेर ह्यात एक दुवा बनून काम करणे, नवऱ्याची आवड निवड, सासरच्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, त्यांच्या आवडी निवडी ह्या सगळ्यात ती तिला हरवून बसते.
 
आणि मग तिचं मन हळू हळू निराशेकडे झुकू लागतं. आनंद काहीसा कमी होत जातो. आवड हे काम वाटू लागतं.
 
ह्या सगळ्या पसाऱ्यात ती स्वतःला काय आवडतं, काय हवं आहे नको आहे ते विचारायचं विसरते. मग त्या छोट्या छोट्या गोष्टी पण मनाला बोचू लागतात. अशावेळी हवा असतो तो फक्त मनमुराद आनंद. ह्या गराड्यात अडकलेला, नाही, हरवलेला आनंद.जो ती शोधत असते.
 
जगण्यातला, छोट्या छोट्या गोष्टीत मिळणारा आनंद. सोडा ना सगळे हेवे दावे, सोडा ती परफेक्शनिस्टची जागा, सोडा ते उगा मनधरणी करणं, सोडा कुणाचं बोलणं मनावर घेणं, सोडा कुणावर रागे भरणं, सोडा ते नको त्या भयंकर अपेक्षा ठेवणं.
 
त्याबदल्यात द्या त्या व्यक्तीला तिचा वेळ, जगू द्या त्यांना त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या विचारांचा आदर करा, कौतुक करा त्याचं, चुकेल तिथे रागवा पण, पण उगा ताणू नका की जेणेकरून कायमचे मन दुखावले जाईल.द्या आनंद दुसऱ्यांना. जगू द्या आणि जगण्याचा आनंद तुम्हीपण लुटा.
 
मुलगा असो वा मुलगी, सगळ्यांच्या आयुष्यात हे घडत असतं, फक्त आज मी ते एका मुलीच्या बाजूने मांडलं आहे फरक फक्त एवढाच.
 
आजच्या दिवशी मलापण जर कुणी विचारलं तर मलापण असाच मनमुराद आनंद हवा आहे.
 
कुठल्याही अटी नसणारा आनंद.
वाद कुठे होत नाही, पण वादानंतर मनवण्यातला आनंद घ्या,
रडल्यावर अश्रू पुसण्याचा आनंद घ्या,
खाल्ल्यावर जेवणाची स्तुती करण्याचा आनंद घ्या,
भेट दिल्यावर चेहऱ्यावर हसू आणून आनंद घ्या,
आठवण येत असेल तर भेटून आनंद घ्या,
वाटा आनंद सगळीकडे आणि द्विगुणित ही करा हो.बघा आयुष्य किती सहज, सरळ आणि सोपे होते ते 
 
बघा असं पण आयुष्य जगून एकदा.
 
Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.
Previous article «
Next article »