स्त्री जीवनातील अमूल्य, आनंददायी क्षण म्हणजे आई होणे!
आई होणे हा प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातील अमूल्य आनंददायी क्षण. हि बातमी कळताच मन रोमांचित, प्रफुल्लित होऊन जाते आणि गरोदर स्त्री भावी जीवनाच्या स्वप्नात रमून जाते. संपूर्ण घरातील मंडळी बाळाची वाट पाहू लागतात. गरोदर स्त्रीची अधिक काळजी घेतली जाते आणि तिची आवड – निवड, पोष्टिक आहार, डॉक्टरांची निवड, औषध – गोळ्या इत्यादि गोष्टी कडे विशेष लक्ष दिले जाते. स्त्री जीवनात हा नऊ महिन्यांचा काळ कधी कधी भावनिक, कधी थोडा शुल्लक तक्रारीचा तर कधी अतिशय आनंददायी असा असतो. अनेक मानसिक, भावनिक बदल गर्भवती स्त्री अनुभवत असते. अश्या वेळी आपला प्रियकर, जीवलग मैत्रीण, आई , सासू – सासरे, नणंद, जाऊ, पोटात वाढत असलेला तो इवलासा जीव. जवळची माणसे आणि त्यांचे वात्सल्य हे त्या स्त्री चे खंबीर आधार स्तंभ असतात आणि ते तिच्या नऊ महिन्यांच्या कालावधी मध्ये तिला बळ देत असतात. पहिल्यांदा गर्भवती झाल्या वर सगळे वरिष्ठ अनुभवी व्यक्ती आप आपल्या परीने तिला सल्ले देत असतात, काय खायचं,काय करायचं,काय नाही करायचं अश्या बऱ्याच गोष्टी तिच्या साठी कुतूहलाचा असतात. डॉक्टर आणि घरची मोठी मंडळी (आई, सासूबाई,जाऊबाई) गर्भ धारणा हा काही आजार नव्हे हे अगदी हमखास सांगतात. पायी फिरत जा, उंच टाचेच्या चपला घालू नको, अमावस्या पौर्णिमा शक्य तोवर बाहेर जाऊ नको, फळ,नारळ पाणी, खोबर खात जा म्हणजे तुझे बाळ गोरे होईल असे हि सगळे सांगतात. विविध बदल घडत असणारा, अनुभवी नऊ महिन्यांचा काळ हा तेव्हाच आनंददायी होतो जेव्हा तिचे बाळ ( काळजाचा तुकडा) तिच्या डोळ्यासमोर येते. सर्व वेदना विसरून मग ती आई आपल्या बाळाच्या संगोपनात आनंदाने रमून जाते.
ह्याच आईपणाविषयी लिहिलेली कविता खाली देत आहे
विषय – काळजाचा तुकडा
तु जीवनी येता मातृत्व सुख मला मिळाले
तुझ्या संगोपनात दिवस कसे सरले नाही कळाले.
तुझ्या सोबती अनुभवले, मी देखील बालपण
गोड सुमधुर क्षणांची, कायम हृदयी साठवण .
वाढवताना तुला, मन हर्षित, प्रफुल्लित
प्रत्येक क्षण आनंदी, नव आशा पल्लवित.
तुझ्या रूपाने आला जणु,घरात माझ्या कृष्ण सावळा
घर झाले गोकुळ, खोड्या तुझ्या आगळा- वेगळा.
काळजाचा तुकडा तु.मोहित करी सर्वांना
तुझ्या वरी जीव ओवाळीते, आदर दे सर्व मोठ्यांना.
औक्षवंत हो, कीर्तिवंत हो. रहा सदा हसतमुख
सफळ, सुदृढ,यशस्वी हो. खांभिर होऊनी झेल सुख– दुःख.
दुःख असावे कोसो दूर तुज पासून, हेच मागणे देवा जवळ
आनंदी दीर्घायुष्य लाभो, तु असावा सुस्वभावी, सरळ.