मुलांकडून नेमकी अपेक्षा कशाची ? फक्त पाठांतराची की मनापासून येणाऱ्या शंखानादाची?

मुलांकडून नेमकी अपेक्षा कशाची ? फक्त पाठांतराची की मनापासून येणाऱ्या शंखानादाची?

स्नेहलचा आठवडा धावपळीत संपायचा कारण शिक्षिका म्हणून एक शाळेवर ती कार्यरत होती.  राजीव,स्नेहल आणि पिहू असं त्रिकोणी कुटुंब होत त्यांचं.  शनिवारी,रविवारी स्नेहल पिहूला तिच्या शाळेने दिलेल्या उपक्रमाना पूर्ण करण्यासाठी मदत करायची. पिहू इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिल्या इयत्तेत शिकत होती. यावेळी तिला समुद्रकिनारी मिळणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करायची होती .मायलेकींची सुरुवात झाली.  ” ए आई आपल्याला वाळू,दगड,शंख,शिंपले लागेल ना गं !”. पिहू म्हणाली.  शंख नाव ऐकताच स्नेहलच्या डोळ्यासमोरून तिच्या शाळेचा जीवनकाल सरकून गेला .

तिला आठवले शाळेमध्ये असताना एक सर त्यांना नेहमी शंख म्हणायचे.  आतापर्यंत शंख म्हणजे देवघरात पूजन करतेवेळी आणि कधीकाळी युद्धाच्या सुरुवातीचे सूचक म्हणून वापरली जाणारी वस्तू एवढेच तिला माहिती होते. पण हे काय सरांचं नवं? स्नेहलला कळायचे की ते शाबासकीचे शब्द तर नक्कीच नाही पण इतर विद्यार्थ्यांना त्याच नावाने हाक मारली जात असल्याने तिने कधीच मनाला लावून घेतले नाही.  वर्गात नुसती गुणांची स्पर्धा असायची. ज्याला जास्त गुण मिळेल तोच पुढे टिकेल असेच मनावर बिंबवले जात होते आणि हे ठरवण्याचे मापदंड होते वर्गातील काही हुशार विद्यार्थी.

अगदी गावातसुद्धा गप्पा रंगायच्या यावेळी कोणाचा पाल्य जास्त गुणांची बाजी मारणार ते. न आवडणारे विषय मला का शिकवले जात आहे हे तिच्या समजण्याच्या पलिकडचे होते,आणि स्नेहल तर साधारण विद्यार्थी होती.  पण दहावीचा निकाल लागला आणि सगळ्यांना चकित करून स्नेहलने चक्क 85%गुण मिळवले होते.  काही हुशार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण होते ते.  शाळेतून निकालपत्रक आणताना केवळ तिच्या हातामध्ये ते सोपवले गेले होते बाकी सर्व गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात मग्न होते. घरी मात्र स्नेहलचे खूप कौतुक झाले.  शिक्षिका होण्याचे ध्येय ठरवून तिने कला शाखा निवडली आणि विद्येचे नवे दालन तिच्यासाठी खुले झाले.

शंख…विद्यार्थ्यांचेही तसेच आहे…शिक्षक प्रत्येक शंखामध्ये एकाच दाबाची हवा फुंकण्याचा प्रयास करत असतात.सगळ्यांकडून पाठांतराचा एकाच सूर काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात पण ते हे विसरतात प्रत्येक शंखाची धून छेडण्याची पात्रता वेगळी आहे,  प्रत्येकाला वेगळ्या सुरांचा ध्यास आहे कधी विज्ञानरुपी तर कधी भाषारूपी.  एकसारखा सूर ऐकण्याच्या नादात बालकाची आवड दबली जाते.  मग मुळात जे आवडत नाही त्याच कामाची अपेक्षा पालक लावून घेतात आणि डॉक्टर,अभियंता,वकील अशा क्षेत्राकडे कल वाढतो.   प्रत्येकाचा शंखनाद निराळा असतो,   एकदा का त्या दाबाच्या फुंकरीची सवय झाली ना की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बाकी गोष्टी त्याच ठराविक साच्याने करण्याची तऱ्हा अंगवळणी पडते आणि त्या ठराविक प्रवाहाच्या विरोधात मी कसा जाऊ असा विचार चांगल्या बुद्धीला प्रश्नपेचात टाकतो.  पण एकदा का तो नाद गवसला की व्यक्ती यशस्वी आणि सुखी होते.   काम आनंदाने केल्या जात.

अरेच्चा मीसुद्धा हेच करते आहे.  केवळ शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांची कुठल्या विषयात आवड आहे हे समजून घेऊन त्यांना त्या दृष्टीने मार्गदर्शन करू शकते.  त्या मार्गाने मला सुरुवात करायला हवी नाहीतर एकच शंखनाद गुंजनार.  आई ,कुठे हरवलीस तू? बघ ना इकडे.  स्नेहल भानावर आली.  पिहूला जवळ घेत ती म्हणाली माझ्या बाळा माझ्यातली मी मला गवसली तुला नाही कळणार ते आणि त्या उपक्रम पूर्ण करण्यास लागल्या पण स्नेहलच्या चेहऱ्यावर नवी दृष्टी मिळाल्याचे आत्मिक समाधान झळकत होते.

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous article «
Next article »