मातृत्व गमावून मातृत्व कमावले, मातृत्व ही संकल्पना शब्दांत बांधणे केवळ अशक्य

मातृत्व गमावून मातृत्व कमावले, मातृत्व ही संकल्पना शब्दांत बांधणे केवळ अशक्य

‘मातृत्व’ ही संकल्पना शब्दांत बांधणे केवळ अशक्य. प्रत्येक स्त्रीच्या पूर्णत्वाची अनुभूती म्हणजे तिचे मातृत्व. आईपण एक-दोन व्यक्तींपुरते मर्यादित नसते..याचा अनुभव म्हणजे माझे ‘मातृत्व’
“क्रियांश” याचा अर्थ होतो सर्वगुणसंपन्न. माझ्या मुलाचं नांव. तो त्याच्या नावाप्रमाणे होण्यासाठीच्या प्रयत्नांत सहसा कधी कमी पडत नाही. आणि त्याच्या जन्मासोबतच माझाही प्रवास सुरू झाला. सर्वगुणसंपन्न होण्यासाठीचा. त्यातील यशापयश हा सापेक्ष विषय आहे. पण माझ्या बाजुने विचाराल तर आज मी आणि माझं मातृत्व कियांशमुळे शब्दशः तावून सुलाखुन निघाल्याप्रमाणे.
निसर्गनियमानुसार पहिल्या मातृत्वाचे नऊ महिने अगदी सुरळीत. त्यात सुदैवाने दोन्हीकडे म्हणजे माहेरी आणि सासरी एकत्र कुटूंबपध्दती. अशा प्रेमळ आणि केअरिंग कुटूंबात आईपणाची सुरवात म्हणजे कौडकौतुकांचा वर्षाव. मी हे कौतुक अनुभवलंय. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या बाळाबरोबर येणारी मातृत्वाची जाणीव,जबाबदारी आणि आनंद. या सगळ्यामध्ये एक व्यक्ती कायम सोबत माझी आई.
जिच्याकडून मला माझ्या पहिल्या वाहिल्या आईपणासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पुर्वार्धात मिळाल्या. आणि दुर्दैवाने उत्तरार्धात मला वंचित रहावे लागले. अवघड असं काही नसतंच कधी. पण आयुष्यातील आईची जागा स्पेशल असते हे मी स्वतः आई झाल्यानंतर अनुभवते आहे.
पहिले बाळंतपणासाठी मी माहेरी दाखल झाले आणि माझी आई दवाखान्यात. दोन्ही किडन्या अकार्यक्षम झाल्यानंतर तिला काहीतरी त्रास होतच असेल ना.? पण याही काळात तिने माझ्यासाठीची करून ठेवलेली तयारी तिचं आईपण मोठ्ठं करणारी होती आणि, माझ्यासाठीचा पहिला धडा. मातृत्वाचा पहिला धडा.
योगायोग चांगले असतील तरी लक्षात राहतात आयुष्यभर आणि वाईट असले तरी. मी बाळंपणासाठी हॉस्पीटलला दाखल झाले त्याचवेळी आईचे डायलिसीस सुरू झालेले. परिक्षा सुरू झाली होती तिची आणि माझी सुध्दा. ज्यावेळी मला तिची आणि, कदाचित तिलाही माझी सर्वात जास्त आवश्यकता होती पण, आम्ही दोघीही ऐकमेकांच्या सोबत नसावे हा कसला योगायोग म्हणावा ? तिच्या जन्मदिनांकापासुन (२२ एप्रिल) बरोबर एक महिन्याने कियांशचा (२२ मे) जन्म. हासुध्दा एक योगायोगच म्हणावा लागेल. माझ्या आईपणाचा आनंद जेवढा मला होता त्यापेक्षा कितीतरी पट अधिक माझ्या आईला झाला होता. तिने तिच्याबाजुने कियांशचे नांवही ‘आनंद’ ठेवले होते. आम्ही दोघीही एका अशा काठावर होतो जिथनं ती मला आणि मी तीला फक्त पाहू शकत होतो. पण स्पर्शही करु शकत नव्हतो.”‘तुझ्या बाळाला इन्फेक्शन होईल.” म्हणून दिड महिना इच्छा असूनही तिने नातवाला स्पर्शही केला नाही.
बाळंतपणानंतर बाळाची काय एक गोष्ट नसते. इथे माझ्यासाठी, मातृत्वाची प्रवेशपरीक्षा फायनल पेपरसारखी अवघड झाली होती. डोळ्यासमोर आई आणि मांडीवर माझे बाळ. या प्रसंगात मोठ्या आई (शिला आणि स्वाती चोरडीया) ,आईच्या बहिणींनी (लता,अनिता,सुनिता, सरोज आणि अर्चना ) सुवर्णामामी, रोशनी आणि सोनम वहिंनीनी दिलेला आधार आणि भावांनी केलेली मदत विसरणे केवळ अशक्य. आईनंतरचे स्थान मावशींचे असते या म्हणीची मी साक्षीदार आहे ती अशी. माहेरची अशी एकही व्यक्ती नसावी ज्यांनी माझी आणि माझ्या आईची या प्रसंगात आईप्रमाणे काळजी घेतली नसावी. रोजचा दिवस मातृत्वाची शिकवण देणारा.रोज काहीतरी नवीन अनुभव.
बायकोच्या मातृत्वाबरोबर नवरेसुध्दा नवीन भूमिकेत शिरतात, पितृत्वाच्या. अशा कठिण प्रसंगांत रोहीतजी माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते. समंजस लाईफपार्टनरप्रमाणे. त्यांना काही सांगायची गरज कधी पडलीच नाही. ते स्वतःच अनेक गोष्टी आम्हा सर्वांसाठी करत होते. आणि माझा भाऊ. अभिजीत चोरडीया. माझ्यापेक्षा लहान असुनही माझ्यासाठी मोठा झालेला, ‘मामा’ या शब्दांत दोन मां आहेत..कियांशसाठी आजही त्याच्या मामाच्या रूपात आज्जी आणि मामाचं प्रेम मिळतेय.
बाळंतपणानंतर लगेच आईचे आजारपण आणि त्यापुढच्या तीनच महिन्यांत मला एका गंभीर शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. या वेळी माझे वडिल अजित चोरडीयांनी दोन्ही भूमिकांमध्ये म्हणजे माझी आई आणि वडील मला दिलेला आधार आणि प्रेम मी शब्दांत नाहीच बांधू  शकणार. माझ्या शस्त्रक्रियेवेळी माझी आई या जगात नसतांना माझे वडिलांनी मातृत्व भावनेने घेतलेली काळजी सिध्द करत होते की, ‘आपण स्वतः कोणाचे तरी पालक झाल्याशिवाय ‘मातृत्व’ कळूच शकत नाही’.
कियांशच्या जन्माबरोबर मी आणि आम्ही सर्व ‘मातृत्व’ अनुभवत होतो ते असे. सर्वात दुर्दैवी योगायोग असा राहिल की, ७ जुलैला आईची तब्येत अधिक खालावली आणि तिने तिचे ‘मातृत्व’ माझ्याकडे सोपवत या जगाचा निरोप घेतला आणि नेमके ८ जुलैला माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी तिच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले.
आज कियांशला त्याची आई म्हणून जे जे करणे शक्य आणि आवश्यक आहे ते करतांना मी काहीच वेगळं करत नाही. जे करतं ते फक्त रिफ्लेक्शन आहे माझ्या आईने अप्रत्यक्षपणे माझ्याकडे सोपवलेल्या मातृत्वाचं. माझं मातृत्व माझ्या आईची आणि त्या प्रत्येक व्यक्तीची देणं आहे ज्यांनी माझ्या कुटुंबाला आणि मला त्या कठिण प्रसंगात साथ-सोबत केली आहे आणि आजही करतात. म्हणूनच की काय, कियांशला सुध्दा सर्वजण सोबत हवे असतात जसे माझ्या आईला.
Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.
Previous article «
Next article »