तिच्या तिसऱ्या वाढदिवसाचे तिसरे पत्र, आईकडून!

तिच्या तिसऱ्या वाढदिवसाचे तिसरे पत्र, आईकडून!

प्रिय कचू,
आज तू ३ वर्षांची झालीस!
वाढदिवसाच्या तुला आभाळ भरून शुभेच्छा!
होय आभाळभर शुभेच्छा याकरता कारण तू आहेसच मुळी तशी.
आभाळासारखी स्वच्छ, निरभ्र, स्वच्छंदी, निर्भिड, सगळं काही आपल्यात सामावून घेणारी.
गेलं वर्ष खूप सुंदर होतं. तुझ्यातल्या खूप अशा नव्याने गोष्टी उमगल्या.तू गेल्या वर्षात खूप काही शिकलीस.
खरंतर नर्सरी चा जॉब मी तुझ्याकरता घेतला. वाटलं की तू आणि मी एकत्र राहू तिकडेपण. पण माझा अंदाज थोडा चुकलाच. तू तुझा  क्लास सोडून माझ्या क्लास मध्ये येऊन बसू लागली होतीस. उगा तिथल्या टीचर आणि मॅडमने समजून घेतलं म्हणून नाहीतर,एकतर तू,नाहीतर मी, असा निर्णय घ्यावा लागला असता. पण थँक यू सगळ्या टीचर्सला की त्यांनी सगळं खूप छान सांभाळून घेतलं.
आता तू दुसऱ्या शाळेत जातेस पण माझ्या क्लास मधल्या मुलांपासून ते तिथल्या मावशीपर्यंत सगळे जण तुझी आपुलकी ने चौकशी करतात. गेल्या वर्षात तू १-२० अंक, A-Z अल्फाबेट, बऱ्याचश्या कविता म्हणायला शिकली, नवे बरेचसे अवघड संस्कृत श्लोक सुद्धा तुझे तोंडपाठ आहेत, तू सगळे रंग ओळखायला लागलीस. विशेष म्हणजे गोल्डन आणि सिल्व्हर कलर पण तुला ओळखता येतो. आजकाल तू माझं ऐकून ऐकून मनाचे श्र्लोकही म्हणायला लागली आहेस.
तुला असा वाढतांना पाहून मनोमन भरून यायचे आणि येते.
गेल्या वर्षात तू खूप म्हणजे खूपच बोलायला शिकली. ते ही अतिशय सुंदररित्या. हो पण गंमतीचा भाग म्हणजे तू माझ्यावर बारीक लक्ष ठेवायला लागलीस.
घरात थोडा जरी भांड्यांचा आवाज झाला की “कसला आवाज आहे आई ?”,”काही पडलं का?”, “काय पडलं ?” असे एक ना अनेक प्रश्न तू मला विचारतेस. कधी कधी तुझ्या असल्या प्रश्नांना वैतागून मी “काही नाही ग सासूबाई ” असं देखील बोलते.
मी स्वयंपाक करत असतांना तू कायम ओट्यावर बसून असते. त्यामुळे तुला मोहरीपासून ते हिंग, लवंग सगळे काही ओळखू येते आणि आजकाल तू मला भाजी चाखून चव कशी झालीये ते सुद्धा सांगायला लागली आहेस. त्यात अजून भर म्हणजे अलीकडेच तू मला काही पदार्थ बनवण्या आधीच ह्यात काय काय लागेल ते सांगत असते.
ह्या वर्षभरात तुझ्या खाण्या पिण्याच्या आवडत्या पदार्थांमध्ये मेथीची भाजी, पालक, भेंडी ह्या भाज्यांची आणि इतर काही पदार्थ जसे मॅगी, पास्ता ह्यांची पण भर पडली आहे.जगात सगळ्या मुलांचा बटाटा आवडता असतो पण तुला काही बटाटा आवडत नाही.हे एक नवल च आहे. तुझ्या एकंदरीत खाण्याच्या सवयी पाहता तुझी पदार्थांची आवड तुझ्या बाबांसारखी आहे हे आता काहीसं कळायला लागलं आहे मला.तुला थालीपीठ आणि पराठे सुद्धा नव्याने आवडायला लागले आहेत आणि हो तुला आजकाल नॉनव्हेज पण तितकाच आवडायला लागला आहे.
आजकाल तू सर्रासपणे मला तुला काय हवं आहे खायला ते सांगत असतेस.कधी कधी खूप रागही येतो मला.एवढ्याश्या जीवाला काय हवी ती आवड निवड.पण हो तुला हवं असलेले सगळे पदार्थ मी तुला तितक्याच आवडीने बनवून देते आणि तू ते खाऊन ” हुं आई हे छान झालं आहे” अशी दाद ही देतेस.
दिवसभर मला छळणारी माझी कस्तुरी मला कधी लागलं तर, “आई तुला काय झालं? लागलं का तुला ? खूप जोरात लागलं का? ” असं म्हणून माझा सगळा राग, शिण घालवते.
इतकी मोठी केव्हा झालीस ग तू कस्तुरी ???
असं म्हणतात मुली खूप लवकर मोठ्या आणि समजूतदार होतात.ते तुझ्या अशा वागण्यातून कळायला लागलं आहे मला.
तुला सांगू का? लग्नाआधी तुझी आजी आणि नंतर तुझे बाबा, ह्या दोघांच्या नंतर माझी काळजी करणारं कुणी आलं असेल तर ती तू.खूप त्रास ही दिलास तू मला गेल्या वर्षी. तुझी शाळा, मला माझ्या शाळेच्या कामात त्रास देणं, घरात धिंगाणा घालणं.पण त्याहून जास्त तू माझी काळजी घेतली हे मात्र तितकच खरं.
मी काही काम करत असताना, “आई , राहू दे ना मी करते ” असे कित्येकदा तू मला बोललीस. लग्नानंतर जर कुणी मला, “हे काम राहू दे तू,मी करते, असं बोललं असेल तर ती तूच.(हे वाचून तुझे बाबा मनातल्या मनात बोलतील.मी जशी कधी मदत च नाही केली तुला. त्यांचेकर्ता पुढचे वाक्य).तुझे बाबाही करतात मदत तशी पण तू जे करतेस आणि ज्या वयात करते आहेस त्याचं खास कौतुक वाटतं मला.
गेल्या वर्षात आपण दोघी खूप छान मैत्रिणी झालो.एकमेकींना काय छान दिसतेय, कुठली लिपस्टिक लावायची, कुठला ड्रेस छान दिसेल हे एकमेकींना सांगू लागलो.मला वाटायचं की वडील आणि मुलीचंच नातं घट्ट असतं पण आई आणि मुलीचं नातं देखील तसं असू शकतं हे तुझ्यामुळे कळालं.
गेल्या वर्षात तू खूप नवे मित्र आणि मैत्रीण बनवल्यास.त्यात छान रमलीस देखील.तुझ्या शाळेत जेव्हा तुला घातलं तेव्हा असं वाटलं होतं की तू एक महिनाभर रडशील.पण तू तर ३ दिवसात च छान रमली तिथे.अजून तर नवीनच म्हणजे अवघ्या २ आठवड्यात तू शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात छान डान्स पण केलास.
घरी येऊन काय काय झालं ते सुद्धा इत्यंभूत सांगायला लागली होतीस. त्यात गंमतीचा भाग म्हणजे तुला कधीपण शाळेतून आल्यावर विचारलं की, “काय काय केलंस कस्तुरी तू आज शाळेत ?” की तुझं उत्तर, “आज मी खूप रडले. मग आशी मॅडम (आश्लेषा मॅडम) ने मला पाणी दिलं आणि थोडसं खाऊ घातलं” असं सांगायची. यानंतर हे आई आपल्याला रोज च विचारते हे कळल्यावर मी तुला विचारायच्या आत च तू मला हे सांगायला लागली.
हुश्श. पाहिलंस.किती सुंदर होतं गेलं वर्ष ते? सांगायला आणि लिहायला वेळ पुरणार नाही इतक्या गोष्टी आहेत.पण हो इथे न लिहिलेल्या गोष्टी, तू मोठी झालीस की, मस्त चहा चा किंवा कॉफी चा मग हातात घेऊन निवांत गप्पा मारताना सांगेल.प्रॉमिस.
मला दिवसभर “आई मला हे दे ना, आई मला ते दे ना” असं म्हणून सतत त्रास देणारी कस्तुरी, मी तुझ्यावर चिडलेली असताना, “आई तू माझ्यावर चिडली आहेस का ? चिडू नको ना, बोल ना माझ्याशी.मी ऐकेल तुझं आणि बाबांचं सगळं.” असं बोलून मला शांत करते.
किती मोठी झालीस ग कस्तुरी तू ? इतकी कशी समजूतदार झालीस अचानक? तू माझ्या आयुष्यात आलेलं परीस आहेस हो तुझ्या येण्याने मी आणि तुझे बाबा खूप बदललो,तुझ्या येण्याने माझं सगळं जग बदललं आहे.
अशीच हसत रहा,अशीच खेळकर रहा, अशीच मनमोकळे पणाने बोलत रहा, अशीच निर्भिड रहा, अशीच आज्ञाधारी रहा जशी तू आत्ता आहेस, अशीच रहा विशेष म्हणजे अशीच कस्तुरी बनून रहा. तुझ्या नावाचा, तुझ्या गुणांचा, तुझ्या चांगुलकीचा सुवास तुझ्या नावाप्रमाणे दरवळू देत जा.’कस्तुरी’ बनून जग.खूप खूप आशीर्वाद आणि पुन्हा एकदा आभाळभर शुभेच्छा तुला पुढच्या वर्षासाठी.
पुन्हा एकदा Wish you many many Happy returns of the day Kasturi. Love you. अगदी मनापासून.
तुझीच,
आई

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous article «
Next article »