खरंच, मुलीचं लग्न हेच जीवनाचे उद्दिष्ट असावे का?

खरंच, मुलीचं लग्न हेच जीवनाचे उद्दिष्ट असावे का?

शीतल माझी सहकारी, सावळी, चुणचुणीत दिसायला गोड. सरकारी नोकरी. वडील सेवानिवृत्त झालेले . एकूण तीन बहिणी, तिशीच्या घरात पोहोचली तरी लग्न जुळेना, सावळा रंग सोडला तर नाकारण्यासारखे काहीही नव्हते तरी पण लग्न जुळत नव्हते. असं वाटायचं काय बघत असेल मुलगा? आईला लग्नाची खूप काळजी. तिला तेवढा लग्नात इंटरेस्ट नव्हता. ती म्हणायची आई लग्न करणे आवश्यक आहे का? मग आई तिला समजवायची की ,अगं कुणी कुणाचं नसतं. वेळेवर लग्न करून आपला संसार करावा. कशी तरी ती तयार झाली. एक स्थळ आलं, मुलगा गरीब घरचा. खाजगी नोकरी, गावातील, कुठलाच काही मेळ नाही. नाईलाजाने ती त्या गोष्टीला तयार झाली.पंधरा दिवसात खटके उडू लागले. दोघेही भिन्न वातावरणातील. तिने कधी घरी काम केले नाही अणि त्याला मोलकरीण म्हणजे काय माहिती नाही. इतकी तफावत. अणि एका महिन्यात ती त्याला सोडून माहेरी आली. लग्न जुळत नाही म्हणून कुठल्याही अटी, शर्ती मान्य करून लग्न करणे आवश्यक आहे का?

अशीच माझ्या ओळखीतली मुलगी. दिसायला खूप ठेंगणी. तिशी पार झाली तरी लग्न जुळेना. मग काय? दिलं असंच गरीब घरी. सगळ्या बहिणी ऎशो आरामात राहतात अणि तिचा माञ जीवन एक संघर्ष सुरू आहे. त्यातल्या त्यात नवरा पण तिच्याशी लग्न करून उपकार केल्यासारखं वागतो. तिची उंची कमी आहे हा तिचा दोष आहे का? लग्न म्हणजे फक्त एक जबाबदारी आहे का? तिच्या अंगावर अक्षदा पडल्या की आई वडीलांचे कर्तव्य संपले. तिच्या जीवनाची घड़ी नीट लावणे आई वडिलाचे कर्तव्य नाही का? तिला स्वावलंबी बनविण्यासाठी मदत करणे आवश्यक नाही का? मुलगी जर आपल्या पायावर उभी आहे अणि काही कारणास्तव तिचं लग्न जुळत नाही, तेव्हा फक्त एक औपचारिकता म्हणून लग्न करणे अवश्यक आहे का? एक महिन्यात लग्न तोडण्या पेक्षा योग्य स्थळाची वाट पाहणे चांगले नाही का? उपवर मुलीला नातेवाईक, समाज, नेहमी विचारतो.” हं, मग लाडू कधी देणार?” एक तर लग्न जुळत नाही म्हणुन आई वडील काळजीत असतात अणि पालकांची काळजी बघुन मुलगी आधीच दुःखी असते… अशा परिस्थितीत मुलीला लग्नाबद्दल विचारून लोकांना काय साध्य करायचं असतं? कुणाच्या व्यक्तिगत जीवनात डोकावण्याची भारी वाईट सवय असते आपल्या लोकांना. एकट्या मुलीला आयुष्य जगणे खूप कठीण असते, हेच लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवलेले असते. ती श्रीमंत घरची असो की गरीब घरची, उच्च शिक्षित असो वर अशिक्षित, तिच्या आयुष्यातील शेवटचे ध्येय म्हणजे लग्न अशीच समाजमान्यता आहे. मी म्हणतेय की लग्न करणे आवश्यक आहे, पण एक चांगला जीवन साथीही महत्वाचा नाही का? जीवनसाथी जर योग्य नसेल तर त्याच्याबरोबर आयुष्य व्यथित करणे खूप त्रासदायक असते. लग्न प्रत्येकाने करायलाच पाहिजे… परंतु योग्य जीवनसाथी मिळत नसेल तर कुठल्याही अटी शर्ती मान्य करून लग्न करणे योग्य आहे का? त्यापेक्षा मुलीला स्वावलंबी बनवा, योग्य साथीदाराची वाट बघा. तुम्हाला काय वाटते मुलीचे लग्न हेच जीवनाचे उद्दिष्ट असावे का?

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous article «
Next article »