आजच्या काळात सगळ्यांनी आवर्जून करावा असा नवा उपवास! - ई उपवास

आजच्या काळात सगळ्यांनी आवर्जून करावा असा नवा उपवास! – ई उपवास

‘इ- उपवास’ ही संकल्पना खरंतर भरपूर जणांनी ऐकली अथवा वाचली असेल. मला नीटसं असं काही आठवत नाहीये, पण मी एकदा मुलांना टी.व्ही. आणि मोबाईल पासून लांब ठेवण्यासाठी तयार केलेल्या गेम्स ची कंपनी आहे, त्यांच्या पेज वर बहुदा इ-उपवास ही संकल्पना वाचली होती. जेव्हा वाचलं होतं तेव्हा तेवढ्यापुरते जाम भारी वाटलं होतं. पण आज प्रकर्षाने जाणवलं ह्याचं माञ वाईट वाटलं.

प्रसंग, अगदी बोलायचं झालं तर सीन तोच,रोजचाच, रोजच्याप्रमाणे उगवणारा नॉर्मल रुटीन असणारा दिवस.

सकाळी उठणे, नवऱ्याचा टिफिन बनवणे, चहा नाश्ता झाला की त्याला हसत ने बाय बाय करणे,आसपास मुलगी खेळत असली तर तिला कडेवर घेऊन ‘ बाबांना बाय करा बाळा’ असं बोलत जे दार लावायचं ते कामवाल्या भाभी आल्या गेल्या वर च बंद करायचं आणि उघडायचं!
मग काय मुलीची आंघोळ, तिचं जेवण, तिची अंगाई, तिची झोप, तिची शी सुसू आणि बरंच काही, ह्यात संध्याकाळचे ५-६ कधी होतात ते कळतंच नाही. मग आपण सवड काढून कॉल करायचा, केव्हा निघणारेस ऑफिस मधून ? दुपारी नीट व्यवस्थित जेवलास का? ओके, मग निघालास की एक मेसेज कर म्हणजे तू येईपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते. (हे खरं आणि रोजचं संभाषण आहे, ह्यात काहीही उगा म्हणून वाढीव लिहिलं नाहीये)
असं म्हणत म्हणत ७-७.३० वाजतात आणि दार वाजते, की लगेचच मी आणि कस्तुरी असेल तिथून, असेल ते काम सोडून दाराकडे पळतो त्यावेळी खरंतर माझ्या आणि कस्तुरी च्या वयात फारसा फरक मला जाणवत नाही हे खरं!
दारात नवऱ्याला बघून खूप आनंद होतो, वाटतं त्याने एक स्माईल द्यावी, पण जॉब आणि जबाबदारी ह्यात तो इतका बिझी असतो की फोन मधून डोकं बाहेर काढायला त्याला क्वचितच वेळ मिळतो. 
असो हे रोजच घडत असते. आज मात्र कुठेतरी वाटलं की नवऱ्याला सांगावं काय काय केलं दिवसभरात ते ! जेवण झालं होतं, म्हटलं बोलूया पाच मिनिटं.बोलत गेले बोलत गेले,बघते तर काय, नवऱ्याला लॅपटॉप मधून मान वर करायला तर जाऊ च द्या पण होकार द्यायला वेळ नव्हता.
मी हसले तर खरी ,पण मनात भीषण अशी शांतता पसरली आणि त्या शांततेला वाचा फोडावी म्हणून आजचा हा लेख !!!

जो प्रसंग आज माझ्या बाबतीत घडला, तो खरंतर कित्येक जण रोज अनुभवत असतील.  मग ते स्त्री असो वा पुरुष, म्हातारं माणूस असो वा लहान मुलंआणि ते असं घडणं आपण ‘आजचं जग, आजकाल चं धकाधकीचे जीवन, आजकाल मेहनत करायची आणि कमवायचे असले की ही लाईफ स्टाईल स्वीकारावीच लागते’, हे आणि असे तत्सम संवाद म्हणून रेटून नेतो. हो की नाही ?पण आतल्या मनाला विचारा एकदा, खरंच स्वीकारलंय का आपण ?

उत्तर ‘नाही’ असंच येईल… 
मान्य आहे की आजकालआय. टी. जॉब्ज मध्ये खूप बिझी शेड्युल असतं, इतर जॉब्ज मध्ये ही असतं, नाही असं नाही, पण बघा की एकदा जगून ह्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स शिवाय… 

काढा की कधीतरी वेळ त्या सगळ्यांकरता जे आपली वाट पहाताये, आपल्या एक एक शब्दांकडे, कानात प्राण आणून वाट बघताहेत तुमच्या बोलण्याची, त्यांच्यासाठी… 

करा एक तरी दिवस इ – उपवास, सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून मुक्त असा एक संपूर्ण दिवस जगण्याचा एक उपवास, आगळा वेगळा उपवास…..

बघा एकदा त्या चिमुकल्या हातांकडे जे बाबा/आई मला घ्या ना असं म्हणताहेत.

बघा एकदा त्या नजरेकडे जिने संध्याकाळी दिवे लागण झाल्यापासुन तुमच्या येण्याकडे , ‘अगं दार उघड की, मी आलोय’ अशा शब्दांकडे लक्षं ठेवलंय

बघा त्यांच्याकडे, ‘जे आपला मुलगा/मुलगी/सुन/जावई किती मेहनत करतात रोज, किती धावपळ असते त्यांची’ असं कौतुकाने बघत आणि चार लोकांत बोलत ही असतात.

जेवण झालं की बोला त्यांच्याशी, जे आपण, ‘ किती नालायक आणि बेअक्कल आहोत आणि तरीपण तुला आम्ही कसं सहन करतो आमचं आम्हाला च ठाऊक’, असं बोलणाऱ्या जिगरी मित्र मैत्रिणी सोबत.

उठलं सुटलं नुसतं फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फिलिंग हॅपी, फिलिंग सँड, फिलिंग हे आणि फिलिंग ते, हे खरडत बसण्यापेक्षा हे प्रत्यक्षात समोरासमोर बोलून बघा तरी.

हॅशटॅग फर्स्ट रेन, हॅशटॅग हॉट कोफी,हॅशटॅग ह्यांव हॅशटॅग त्यांव हे लिहिण्यापेक्षा पावसाची ती सर आणि तो गरम कॉफी चा कप हातात धरून तो क्षण जगा की, बघा ऑफिस च्या, घराच्या खिडकीतून पाऊस एकदा

वॉट्सअप वर सतरा वेळा स्टेटस अपडेट करण्यापेक्षा डायरीत लिहून बघा, तिच डायरी काही वर्षांनी मंत्रमुग्ध अशा आठवणी देऊन जाईल….

व्हाटसअप च्या स्टेटस मध्ये फोटो टाकून, कंमेंट्स वाचण्यापेक्षा(फक्त समोरच्याने आपल्या पण स्टेटस ला कमेंट द्यावी ह्याकरता कंमेंट करणारे पण बरेच असतात बरं का..) आपण काढलेले फोटो डेव्हलप करून नुसते आडवे तिडवे चिकटवा आणि जे कुणी घरी येतील त्यांच्या प्रतिक्रिया देताना चा आनंद टिपा….. , 

बघा, एकदा तरी आयुष्यात असा प्रयोग करुन,
बघा, एकदा तरी स्वतःसाठी जगून,
बघा, एकदा तरी आनंदी होऊन….. ,
बघा, एकदा तरी ‘इ-उपवास’ करून ……!!!

आणि हो , कसा होता उपवास हे मला सांगायला विसरू नका.

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous article «
Next article »