आईच्या प्रबळ इच्छाशक्तीची किमया !

आईच्या प्रबळ इच्छाशक्तीची किमया!

वय अकरा महीने. आणि इवली पावले जमिनीवर चालू लागली. हे प्रत्येक इवले पाऊल म्हणजे धैर्य, शौर्य, हिंमत आणि संघर्षाचं प्रतीक होतं. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करुन ‘मै भी कुछ कम नही’ सांगत होतं. या प्रत्येक पावलाबरोबर आठवणारा भूतकाळ हा आजही अंगावर काटा उभा करतो.

आठव्या महिन्यात झालेला जन्म, चौदाशे ग्रॅम वजन, जन्मानंतर तिसऱ्याच दिवशी झालेला manengities (मेंदूज्वर ), ६७ पेक्षा जास्त इंजेक्शन आणि सलाईनस्,सलाईन आऊट, तीन ब्रेन सोनोग्राफीज,ब्रेन हिमरेज, दोन वेळा काढलेलं मणक्यातील पाणी, चाळीस हजारांपेक्षा कमी झालेली प्लेटलेट्सची संख्या, अपरिपक्व रेटीना,डोळ्यांच्या इन्फेक्शन नंतर डोळ्यातून येणारे रक्त आणि आधार होता तो फक्त थेंब थेंब दुधाचा. हे वाचल्यावर खरोखर कोणालाही वाटेल हे बाळ जगेल का? जगले तरी याला ऐकू येईल का? नीट दिसेल का? याचा विकासइतरांप्रमाणेच होईल का? चालेल का? बसेल का? बोलेल का? बौद्धिक विकास कसा असेल?असे एक ना अनेक प्रश्न होते.

तिची अशी अवस्था बघून खरं तर माझ्याच पायातले त्राण निघून गेले होते. एकावर एक होणाऱ्या आघातांमुळे मी पूर्णपणे कोलमडून जात होते. पण NICU मध्ये मी तिच्या जवळ गेल्यावर या ही परिस्थितीत ती मला खूप छान प्रतिसाद द्यायची. मी जवळ गेल्यावर तिची हालचाल व्हायची. माझा आवाज ऐकून डोळे उघडून ती बघण्याचा प्रयत्न करायची. ते बघून तेव्हाच मी ठरवलं माझ एवढंसं लेकरू एकट्याने न घाबरता, न डगमगता परिस्थितीशी झुंज देत आहे, तर मग आपण का मागे राहायचं, ती तर आपल्या विश्वासावर या जगात आलेली आहे. आलेली परिस्थिती आव्हान म्हणून स्वीकारायची,आपल्या परीने जेवढं आणि जे काही शक्य आहे ते करायचं. नकारात्मक विचार करायचाच नाही. आता काय होईल आणि कसं होईल हा विचार करण्यापेक्षा आता काय करायला पाहिजे यातून सुखरूप बाहेर कसे पडता येईल याचाच विचार करायचा.

मी बाळाशी सतत सकारात्मक गप्पा मारायला सुरुवात केली.बाळाला दूध पाजताना कायम सकारात्मक विचार करायला सुरुवात केली. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे, दुधाच्या वेळा काटेकोरपणे सांभाळल्या. तिला सलाईन देताना तर अक्षरशः तीन-तीन,चार-चार तास तिचा पाय किंवा हात हातात धरून बसावे लागायचे. कितीदा तरी सलाईनच्या सूया बदलताना नस सापडायची नाही त्यावेळेसचा तिचा आक्रोश माझी ताकद वाढवायचा असं वाटायचं की ती सगळं सहन करते तर मग आपण का रडायचं, आपणच खंबीरपणे उभं राहायला हवं.

सुरवातीचे दोन-तीन महिने गेल्यावर ती सर्वसामान्य बाळांच्या बरोबरीने आली . त्यानंतर मात्र आम्ही कधी मागे वळून बघितलेच नाही. आठव्या महिन्यात जन्म घेऊनही ती अकराव्या महिन्यात चालू लागली.इतर बाळाप्रमाणे खोटाखोटा खोकला येणे दादा मामा ,बाबा हे शब्द बोलू लागली. लपाछपी, पकडापकडीचा खेळ खेळू लागली. चिऊ ,काऊ, भूभू दाखवू लागली.

आज मागे वळून बघतांना खरंच असं वाटते की तिला मोठा करताना मीच खूप गोष्टी शिकले. आणि मला प्रत्येकालाच सांगावसं वाटतं की ‘Miracles do happen especially when the human spirit takes over’.

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous articlePickle Recipes – Spice Up Your Meal with Homemade Achaar
Next articleMy Delivery Story – Heaven after All the Pain in the World