खरं तर तरुण पिढी मस्त आहे, फक्त आपण त्यांना ओळखायला हवं!

खरं तर तरुण पिढी मस्त आहे, फक्त आपण त्यांना ओळखायला हवं!

अरे सीटीओ, हा माझा फोन बघ बरं का इतका स्लो झालाय?” माझे वडील, वय वर्ष ७३, सकाळी सकाळीच माझ्या घरी दाखल झाले.सीटीओ, म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, म्हणजे माझा मुलगा, इयत्ता बारावी पास. आमच्या घरातील तमाम गॅजजेट्स, विकत घेण्यापासून दुरूस्ती, मेंटेनन्स आणि स्क्रॅप करण्यापर्यंत सर्व व्यवस्था तो बघतो. “अहो अबू अपडेट्स आले आहेत. “सीटीओ उवाच. मग काही वेळ मोबाईल फोन  व त्याचे अपडेट्स या विषयी आजोबा नातवामध्ये ज्ञानदान व तदनंतर चहापान असा कार्यक्रम पार पडला.  निघताना नातवाला शाबासकी देत आजोबा म्हणाले, “थँक्स बरका! माझ्या मोबाईल बरोबर मलाही अपडेट केल्याबद्दल!” आजोबा आणि नातू खळखळून हसले.

त्यांचं ते वाक्य एकदम क्लिक झालं डोक्यात.अपडेट राहणं किती महत्त्वाचं झालंय आजकाल! तुफान वेगानं बदलणारं जग आणि त्याही पेक्षा जास्त वेगानं बदलणारी टेक्नॉलॉजी. त्या वेगाशी, त्या बदलाशी जुळवून घेताना दमछाक होते कधी कधी. आमची चाळीशीत ही कथा मग साठी सत्तरीच्या मंडळींनी  काय करावे?

माझ्या वडिलांनी हा प्रश्न त्यांच्यापुरता सोडवला आहे. ते खूप वाचतात, बातम्या बघतात, जमेल तेव्हा आणि तसं जग फिरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या वयोगटातील लोकांशी मैत्री करतात. गप्पा मारतात. नातवंडं म्हणजे त्यांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. यामुळे सगळ्यांनाच ते आपलेसे वाटतात.

या उलट अनेक माणसं मी आजूबाजूला बघते.सगळ्याच वयाची. ही माणसं सतत कशाला तरी नावं ठेवत असतात. टी.व्ही. वरचे प्रोग्रॅम असोत, चित्रपट असोत, रस्ते असोत, मॉल असोत, हवा,पाणी सगळ्यातच त्यांना प्रॉब्लेम्स दिसतात. नव्या पिढी बद्दल तर विचारूच नका. त्यांच्या मते हि पिढी वाया गेलीये.

खरंतर तरुण पिढी मस्त आहे. ती नेहमीच मस्त असते. नव्या कल्पना, नवी स्वप्नं, जगायची नवी पद्धत. त्यांच्या साठी सगळंच एकदम सही. काहीच अशक्य नाही. अशा कंपनी मध्ये कसं ताजेतवाने होते मन. थोडीफार मतभिन्नता असली तरी एकूण सगळं मजेशीर असतं. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, त्यांचे आवडते चित्रपट बघितले, त्यांना समजून घेतलं तर मुलंही आपल्याशी छान वागतात. थोडक्यात काय तर छान आहे सगळं.

गुड न्युज म्हणजे आपल्याकडे चॉईस आहे. अपडेटेड राहायचा, आनंदी राहायचा, जगाबरोबर राहायचा.
अपडेटस आर आव्हायलेबल!
तर डाउनलोड करायचे की नाही ते ज्याचं त्यानी ठरवायचं!

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous article «
Next article »